प्रयोग मराठी व्याकरण । प्रयोग व त्याचे प्रकार । Prayog Marathi
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी व ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात ‘प्रयोग’ असे म्हणतात. क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो.
महत्त्वाचे :
1 ) ज्याला प्रत्यय असतो त्याचा क्रियापदावर प्रभाव नसतो; म्हणजेच ज्याला प्रत्यय आहे, त्यानुसार प्रयोग ठरत नाही.
2) ज्याला प्रत्यय नाही तो घटक क्रियापदावर अधिकार गाजवितो;म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही तो प्रथमेतला घटक प्रयोग ठरवतो.
3) कर्मणी व भावे प्रयोगात कर्त्याला तृतीया, चतुर्थी, षष्ठी असे प्रत्यय येऊ शकतात तर कधी शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडले जाऊ शकते.
प्रयोग ओळखण्यासाठी सकर्मक व अकर्मक वाक्यांतील फरक माहित असणे आवश्यक आहे. कर्त्यांला ‘ने’ प्रत्यय जोडल्याबरोबर क्रियापदाला ला/लो/ली/ले. प्रत्यय येत असेल म्हणजेच वाक्य भूतकाळी होत असेल तर ते वाक्य सकर्मक असते अन्यथा अकर्मक असते.
सकर्मक वाक्य :
क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो.
1) पक्षी (पक्षाने) मासा पकडतो. (पकडला)
2) मधू (मधूने) दूध पितो. (पिले)
3) लता निबंध लिहिते. 4) माळ्याने झाडाचा आंबा तोडला.
अकर्मक वाक्य :
क्रिया करणारा व सोसणारा तोच असतो.
1) बाबा मुंबईला गेले,
2) हरण्याच्या कानात वारे शिरले.
3) जाईच्या मांडवावर फूल उमलले.
4) मला पपई आवडते.
टीप : मला चंद्र दिसतो, ताईला साडी शोभते, मला पपई आवडते. अशा वाक्यात चंद्र, साडी, पपई हेच वाक्याचे कर्ते आहेत, जुन्या काळात काही लेखकांनी मला ताईला हे कर्ते माणलेले आहेत; परंतु ही बाब आता कालबाह्य मानली जाते. तसेच क्रियापदाला केव्हा/कोठे/कसे असे प्रश्न विचारल्यास उत्तर येणारे शब्द कर्म नसतात.
प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे
प्रयोगाचे प्रकार :
प्रयोगाचे खालील मुख्य 3 प्रकार पडतात.
1. कर्तरी
2. कर्मणी
3. भावे
1) कर्तरी प्रयोग :
कर्तरी प्रयोगाचे खालील दोन उपप्रकार पडतात.
अ) अकर्मक कर्तरी ब) सकर्मक कर्तरी
(1) अकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे :
1) कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो.
2) वाक्यात कर्म नसते.
3 ) क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलते. म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो.
4) वाक्याचा काळ वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही असू शकतो.
उदा :
1) मला पपई आवडते.
2) श्रावणीला थंडी वाजते.
3) पक्षी आकाशात उडाला.
4) ती मोठ्याने हसेल.
5) राजाला मुकुट शोभतो.
6) सूर्य पूर्वेला उगवतो.
7) पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती.
( 2 ) सकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे :
1) वाक्यात कर्म असावेच लागते, ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते.
2) वाक्य शक्यतो वर्तमानकाळी असून कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो.
3) कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो.
4) क्रियापद कर्त्याच्या लिंग-वचनानुसार बदलते, कर्मानुसार नाही. बदलत
उदा :
1) राम रावण मारतो.
2) धोंडू गाय बांधतो.
3) लता चिंच खाते.
4) रामू कुत्र्याला पळवतो.
टीप : सकर्मक कर्तरी प्रयोगात व्यक्ती व प्राणीरूपी कर्माला प्रत्यय जोडले जाऊ शकतात, तर वस्तूरूपी कर्माला शक्यतो प्रत्यय नसतात.
2 ) कर्मणी प्रयोग :
कर्मणी प्रयोगाच पाच प्रकार पडतात व खालील दोन गटात विभागणी होते.
अ) प्रधानकर्तृक कर्मणी ब) गौणकर्तृक कर्मणी :
अ) नवीन कर्मणी
ब) समापन कर्मणी
क) शक्य कर्मणी
ड) पुराण कर्मणी
अ) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोगाची लक्षणे :
1) कर्त्याला बहुधा तृतीया / चतुर्थीचा प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय नसतो.
2) क्रियापदाची रचना कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विध्यर्थी असते.
3) कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते; परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्त्व दिले जाते.
उदा :
1) रामाने काम केले.
2) त्याला धंदा सोडावा लागला.
3) रामाने काम करावे.
4) त्याने पत्र लिहिले.
ब) गौणकर्तृक कर्मणी :
या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्त्व असते. याचे खालील 4 उपप्रकार पडतात.
1) हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.
2) कर्त्याला कडून प्रत्यय असतो.
3) कर्म प्रथमेत असते. 4) क्रियापद शक्यतो भूतकाळी / विध्यर्थी असते.
उदा :
1) शिपायाकडून चोर धरला गेला.
2) शिपायाकडून चोर धरला जातो.
3) धोंडूकडून गाय बांधली जावी.
4) मांजराकडून उंदीर मारण्यात आला.
ब ) समापन कर्मणी :
1) क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवितो.. 2) कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो, कर्माला मात्र प्रत्यय नसतो.
3) धातू + ऊन / हून प्रत्यय असून पुढे झाला, होईल, व्हावे असे सहायक क्रियापद असते.
उदा :
1) हेमाचे पुरण वाटण झाले.
2) लताचा धडा वाचून होईल
(3) राजूचे पत्र लिहूण व्हावे.
क) शक्य कर्मणी :
1) क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, असा अर्थ व्यक्त होतो. सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा
2) कर्त्यास तृतिया/चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो.
(3) कर्म प्रथमेत असते..
4) धातुस व, अव, अवव असे प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते.
उदा :
1) मला हे काम करवते.
2) आईच्याने भांडी घासवतात.
3) त्याच्याच्याने एवढे पदार्थ खाववले जाणार नाहीत.
ड) पुराण कर्मणी :
1) हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आला आहे.
2) अशी वाक्यरचना फक्त प्राचीन काव्यात आढळते. 3) अशी रचना शक्यतो गद्यात आढळत नाही..
(4) सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय असतो.
उदा :
1) त्वा काय कर्म (कर्म) करिजे लघू लेकराने (कर्ता).
2) नळे इंद्रासी असे बोलिजेले.
3) भावे प्रयोग :
भावे प्रयोगाची लक्षणे :
1) वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. अकर्मक असल्यास कर्त्याला प्रत्यय असतो.
2) क्रियापद स्वतंत्र, तृतिय पुरुषी, नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असते.
3) क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विध्यर्थी असते.
भावे प्रयोगाचे खालील 3 प्रकार पडतात.
1) प्रधानकर्तृक भावे :
अ) सकर्मक भावे ब) अकर्मक भावे
2) गौणकर्तृक भावे :
अ) पूराण भावे ब) नवीन भावे
क) शक्य भावे ड) समापन भावे
3) अकर्तृक भावे :
1) प्रधानकर्तृक भावे : या प्रकारात खालील दोन उपप्रकारांचा समावेश होतो.
अ) प्रधानकर्तृक सकर्मक भावे :
1) या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते.
2) कर्त्याला शक्यतो तृतीयेचा ने/नी प्रत्यय असतो.
3) कर्माला प्रत्यय असतो.
उदा :
1) धोंडूने गाईला बांधले.
2) रामाने रावणाला मारावे.
ब) प्रधानकर्तृक अकर्मक भावे :
1) सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणेच लक्षणे असतात, फक्त वाक्यात कर्म नसते.
2) अकर्मक भावे प्रयोगात कर्त्यांला प्रत्यय असतो, तर क्रियापद
शक्यतो विध्यर्थी किंवा शक्यार्थ असते.
उदा :
1) त्याने आता घरी जावे.
2 ) गौणकर्तृक भावे : याचे पुढील 4 उपप्रकार पडतात.
अ) गौणकर्तृक पुराण भावे :
1) हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो.
2) या प्रकारात वाक्यात कर्म नसते. (अकर्मक वाक्य)
(3) कर्ता तृतीया विभक्त असतो.
4) क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय असतो.
उदा :
1) पुण्यात्मके पापे स्वर्ग जाईजे.
2) पापात्मके पुण्ये नरका जाईजे.
ब) गौणकर्तृक नवीन भावे :
1) कर्त्याला कडून प्रत्यय असतो.
2) कर्म प्रत्यययुक्त असते.
उदा. पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल/आले/ यावे.
क) गौणकर्तृक शक्य भावे :
1) कर्ता चतुर्थी / तृतीयेत असतो. 2) वाक्य अकर्मक असते.
3) धातूला व, अव, अवव प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते.
उदा :
1) रामाला घरी जाववते.
2) राजूला आता चालवते.
3) बाळाच्याने आता खाववते.
ड) गौणकर्तृक समापन भावे :
1) क्रियापद कार्य समाप्तीदर्शक असते.
2) वाक्यात शक्यतो कर्म नसते, असल्यास ते द्वितीयेत असते.
3) कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो.
उदा :
1) त्याचे हसून झाले.
2) रामाचे रावणास मारून झाले.
3) अकर्तक भावे/ भावकर्तरी प्रयोग :
1) वाक्य अकर्मक असते.
(2) क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो; म्हणजेच क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवितो.
उदा :
1) आज सारखे गडगडते. (गडगड).
2) गावी जाताना वडगावजवळ उजाडले. (उजेड)
3) दिवसभर सारखे धडधडते. (धडधड)
मदतीसाठी काही प्रश्न व त्यांची उत्तरे :
1 ) कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्परसंबंधांना
1) वाक्य 2) शब्दसमूह 3) कर्तरी प्रयोग 4) प्रयोग
उत्तर : 4) प्रयोग
2) चुकीचा पर्याय निवडा.
अ) ‘सभेत पत्रके वाटली गेली. – कर्मणी (कर्मकर्तरी)
ब) ‘आम्ही पुस्तक वाचले – कर्तरी
क) ‘त्याची गोष्ट सांगून झाली – समापन कर्मणी ड) ‘मला मुंबईस जावयाचे आहे.’ अकर्मक कर्तरी प्रयोग
1) अ, ब
2) ब, क
3) ब, ड
4) अ, ड
उत्तर : 3) ब, ड
3) खालील वाक्याचा प्रयोग सांगा.
‘थोरांकडून सत्य बोलले जाते’ (PSI-13).
1) प्रधानकर्तृक कर्मणी
(2) कर्तरी प्रयोग
3) भावे प्रयोग
4) नवीन कर्मणी प्रयोग
उत्तर : 4) नवीन कर्मणी प्रयोग
4) खालील वाक्याचा प्रयोग सांगा.
‘त्याने आता घरी जावे.
1) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) सकर्मक भावे प्रयोग
2) अकर्मक कर्तरी प्रयोग
4) अकर्मक भावे प्रयोग
उत्तर : 4) अकर्मक भावे प्रयोग
5) ‘आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) अकर्मक कर्तरी
2) सकर्मक कर्तरी
3) भावे
4) कर्मणी
उत्तर : 4) कर्मणी
6 ) विवेक क्रिकेट खेळतो.
1) कर्मणी
(2) सकर्मक कर्तरी
(3) अकर्मक कर्तरी
(4) भावे
उत्तर : (2) सकर्मक कर्तरी
7 ) मीनलचे पेन काल हरवले.
(1) कर्मणी
2) सकर्मक कर्तरी
(3) अकर्मक कर्तरी
4) भावे
उत्तर : (3) अकर्मक कर्तरी
8) सारे पोपट उडाले.
(1) सकर्मक कर्तरी
2) अकर्मक कर्तरी
(3) कर्मणी
(4) भावे
उत्तर : 2) अकर्मक कर्तरी
9) राजाने राजवाडा बांधला.
1) कर्मणी
(2) कर्तरी
3) भावे
4) कर्मणी व भावे
उत्तर : 1) कर्मणी
10 ) ती गाणे गाते.
1) सकर्मक कर्तरी
2) अकर्मक कर्तरी
(3) कर्मणी
4) भावे
उत्तर : 1) सकर्मक कर्तरी
11 ) गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे.
(1) सकर्मक कर्तरी
2) भावे
(3) अकर्मक कर्तरी
4) कर्मणी
उत्तर : (1) सकर्मक कर्तरी
Video credit : Dr.priti Patil Youtube channel
topic :
prayog grammar in marathi । प्रयोग व त्याचे प्रकार । प्रयोग मराठी व्याकरण
आमच्या इतर काही व्याकरण संबंधित पोस्ट :
-
रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan
-
निबंध लेखन कसे करावे ?
-
वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?
-
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद.
Very very good.