मुलाखत लेखन ९ वी ते १२ वी । मुलाखत लेखन नमुना
मुलाखत म्हणजे काय ?
एखादया व्यक्तीचे जीवनकार्य जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधणे म्हणजे ‘मुलाखत’ होय. सर्वसाधारणपणे मुलाखतीमध्ये दोन व्यक्ती असतात. मुलाखत घेणारी व्यक्ती (मुलाखतकार) प्रश्न विचारते आणि मुलाखत देणारी व्यक्ती (मुलाखतदाता) त्या प्रश्नांची उत्तरे देते. त्याचप्रमाणे मुलाखत ऐकणारे श्रोते, प्रेक्षक हे तिसरे केंद्र असते. मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा आपल्याला मुलाखतदात्याच्या कार्याच्या विविध पैलूंची ओळख करून देत असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व उलगडवत असतो.
मुलाखत लेखनासाठी काही महत्त्वाचे मुद्दे
१. भेट, गाठ, बोलाचाली, विचारपूस हे ‘मुलाखत‘ या शब्दाचे अर्थ आहेत.
२. मुलाखतीत मुख्यतः दोन व्यक्ती असतात :
(१) प्रश्न विचारणारी म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती . तिला मुलाखतकार (Interviewer) म्हणतात.
(२) प्रश्नांना उत्तरे देणारी म्हणजे मुलाखत देणारी व्यक्ती तिला मुलाखतदाता (Interviewee) म्हणतात. मुलाखतीची ही दोन केंद्रे आहेत.
३. मुलाखतीचे वाचक, श्रोते व प्रेक्षक (Audience) हे तिसरे केंद्र होय.
४. मुलाखतदाता हे शिखर आणि मुलाखतकार, वाचक, प्रेक्षक, श्रोते हा पाया होय. ५. कर्तबगार माणसे व सामान्यांना न पेलणारी आव्हाने स्वीकारून असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्ती यांची मुलाखत घेतली जाते.
५ . कर्तबगार मानसे व सामान्यांना न पेलणारी आव्हाने स्वीकारून असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्ती यांची मुलाखत घेतली जाते .
६. मुलाखतीतून योग्य व जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करणारी विश्वसनीय अशी माहिती मिळते, तेव्हा ती चांगली मुलाखत ठरते.
मुलाखतीचे हेतू
(१) मुलाखतदात्याचे कार्य जाणून घेणे,
(२) मुलाखतदात्याची मते जाणून घेणे.
(३) त्याचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे.
(४) श्रोत्यांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे मुलाखतीत सहभागी करून घेणे.
मुलाखतीचे प्रकार
(१) व्यक्तिगत मुलाखत (Personal Interview) : विशिष्ट कारणासाठी एखादया व्यक्तीची मुलाखत घेतली जाते, तेव्हा तिला व्यक्तिगत मुलाखत म्हणतात,
(२) गट मुलाखत (Group Interview) : एखादया विषयावर एखादया गटाची मुलाखत घेतली जाते, तेव्हा तिला गट मुलाखत म्हणतात.
(३) प्रकट मुलाखत (Open Interview) : साचेबंद मुलाखतीऐवजी मनमोकळ्या गप्पांच्या स्वरूपात घेतलेल्या मुलाखतीला प्रकट मुलाखत म्हणतात.
(४) जन मुलाखत (Mass Interview) : एखादया विषयावर नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी त्यांची घेतलेली मुलाखत म्हणजे जन मुलाखत होय..
(५) नोकरीसाठी मुलाखत (Job Interview) : एखादया पदावर नेमणूक करताना व्यक्तीचे काही गुण जाणून घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीला नोकरीसाठी मुलाखत म्हणतात,
(६) संरचित मुलाखत व असंरचित मुलाखत (Structural and Non-structural Interview) : मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न मुलाखतदात्याला मुलाखतीपूर्वी दिले जातात आणि मुलाखतदाता तयारी करून प्रश्नांना उत्तरे देतो, या प्रकारची मुलाखत म्हणजे संरचित मुलाखत होय.
कधी कधी मुलाखतीचा आराखडा, प्रश्न तयार न करता, एका प्रश्नातून दुसरा प्रश्न विचारत विचारत मुलाखतदात्याचा समग्र दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, ती असंरचित मुलाखत होय. या प्रकारच्या मुलाखतीसाठी मुलाखतकाराला खूप पूर्वतयारी करावी लागते. मुलाखतदात्याच्या अवतीभवतीची माणसे, त्याची जडणघडण झाली तो परिसर आणि त्याचे कार्यक्षेत्र यांची सखोल माहिती मुलाखतकाराला असणे आवश्यक असते.
मुलाखतकाराची पूर्वतयारी
(१) मुलाखतीचे उद्दिष्ट निश्चित करावे.
(२) माहिती मिळवण्याची मर्यादा निश्चित करावी.
(३) मुलाखतीसाठी मुलाखतदात्याचा पूर्वेतिहास जाणून घ्यावा…
(४) त्यानुसार प्रश्नावली तयार करावी.
मुलाखतकाराने घ्यावयाची काळजी
(१) मुलाखतदात्याशी सहज संवाद साधावेत.
(२) मुलाखतदात्याचा योग्य आदर राखावा.
(३) मुलाखतदात्याचा सुरुवातीला कमीत कमी शब्दांत परिचय प्रस्तावनेत लिहिणे अपेक्षित आहे.
(४) प्रश्नातून प्रश्न निर्माण करीत जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करावा.
(५) मुलाखतकाराने कमी बोलावे, मुलाखतकर्त्याला अधिकाधिक बोलते कराने.
मुलाखत लिहिताना घ्यावयाची काळजी :
(१) मुलाखतीचे लेखन करण्याआधी प्रास्ताविक/परिच्छेद लिहिणे अपेक्षित आहे.
(२) मुलाखतीसाठी प्रश्न तयार करावेत.
(३) फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे येणारे प्रश्न टाळावेत.
(४) प्रश्नांनुसार नेमकी व मुद्देसूद उत्तरे तयार करावीत.
(५) मुलाखत घेण्याचा सराव करावा.
मुलाखत लेखन नमुना कृती
(१) राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत.
उत्तर: प्रश्नावली
(प्रथम अभिनंदन करणे व नाव, महाविद्यालयाचे नाव, इयत्ता इत्यादी तपशील विचारणे.)
(१) वक्तृत्वाची आवड कशी निर्माण झाली ?
(२) बालपणी कोणाचे संस्कार / मार्गदर्शन लाभले ?
(३) शालेय कालावधीत कोणाकडून व कसकसे उत्तेजन मिळत गेले?
(४) वक्तृत्वकला विकसित करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले ? उदा., आवाज कमावणे, सभाधीटपणा मिळवणे, काही प्रमाणात अभिनयकौशल्य प्राप्त करणे इत्यादी.
(५) अवांतर वाचनाची गरज असते की नाही ? अवांतर वाचनासाठी कोणते प्रयत्न केले ?
(६) काही विषयांवरील भाषणे आधीच तयार करून ठेवली आहेत काय ?
(७) भाषण लिहून काढण्यासाठी काय काय करता?
(८) अन्य वक्त्यांची भाषणे ऐकणे आवश्यक वाटते का ?
(२) वृक्षमित्र समितीच्या अध्यक्षांची मुलाखत.
उत्तर : प्रश्नावली
(१) वृक्षमित्र बनावे, ही जाणीव प्रथम कधी व का झाली?
(२) वृक्षसंवर्धनाची गरज अधिकाधिक का जाणवू लागली ?
(३) या कार्याला सुरुवात कशी केली ?
(४) त्याला यश कसे मिळत गेले?
(५) यात अडथळे आले का?
(६) स्वार्थी हितसंबंधी व समाजकंटक लोक आड आले का? (७) त्यांना दूर ठेवणे कसे शक्य झाले?
(८) सर्वसाधारण जनतेला आपल्या कार्यात कसे सहभागी करून घेतले?
(९) आपल्या पश्चातही हे कार्य चालू राहावे, यासाठी कोणती योजना आखली आहे?
(१०) शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी या चळवळीत कोणते योगदान देऊ शकतात ?
(३) सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेची मुलाखत.
उत्तर: प्रश्नावली
(१) परिचारिका पेशा का स्वीकारला? केवळ नोकरी म्हणून की सेवावृत्ती म्हणून?
(२) या पैशात येऊन किती वर्षे झाली? योग्य मोबदला मिळतो असे वाटते का ?
(३) कामाच्या ठिकाणच्या सोयी कशा आहेत?
(४) दरदिवशी काम केल्याचे समाधान मिळते का ?
(५) लोकाचे सहकार्य मिळते का?
(६) लोक सन्मानाने वागवतात का?
(७) रुग्ण व नातेवाईक यांची वर्तणूक कशी असते ?
(ट) इतरांनीही या पेशात यावे असे वाटते का?
(९) या पेशाचे तुमच्या मते कोणते महत्त्व आहे?
(१०) आनंदाचे क्षण सांगता येतील ?
(११) एखादा कटू अनुभव ?
(१२) या पेशात असलेल्या तसेच नव्याने येऊ पाहणाऱ्यांना कोणता सल्ला दयाल ?
(४) उपाहारगृहात काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत.
उत्तर : प्रश्नावली
(१) उपाहारगृहात नोकरी का करावी लागली ?
(२) घरी कोण कोण आहेत ? घरची परिस्थिती कशी आहे?
(३) या नोकरीमुळे अपमानास्पद अवस्था मिळाली असे वाटते का?
(४) योग्य मोबदला मिळतो का ? नोकरीच्या ठिकाणी योग्य सोयीसुविधा मिळतात का ?
(५) हे काम करता करता अधिक प्रगती करावी, असे वाटते का? त्यासाठी कोणते प्रयत्न करता ?
(६) मालक व अन्य सहकारी कसे वागतात ? ग्राहक कसे वागतात ?
(७) या नोकरीत काम करणाऱ्यांना कोणत्या सोयीसुविधा मिळाव्यात असे वाटते ?
(८) ही नोकरी सन्मानाची होण्यासाठी काय होणे आवश्यक वाटते ?
(५) पोलिसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी घेतलेली पोलिसाची मुलाखत.
उत्तर : प्रश्नावली
(१) पोलीस खात्यात वयाच्या कितव्या वर्षी दाखल झालात ?
(२) कुठेतरी नोकरी करायची म्हणून पोलीस खात्यातील नोकरी स्वीकारली की, ‘पोलीसच व्हायचे’ असे ठरवले
(३) नोकरीत तुम्हांला काय काय करावे लागते ?
(४) कोणत्या प्रकारच्या लोकांशी जास्त प्रमाणात तुमचा संबंध येतो ?
(५) नोकरीतील कामाचा घरच्या लोकांना कधी त्रास होतो का ?
(६) नोकरीत कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ? त्यांवर कशी मात करता ?
(७) कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहजपणे सहभागी होऊ शकता का ?
(८) ही नोकरी करीत असल्याबद्दल कधी पश्चात्ताप होतो का ?
(९) तुम्ही आम्हां विद्यार्थ्यांना कोणता संदेश दयाल ?
Topic :
- मुलाखत म्हणजे काय ?
- मुलाखतीचे हेतू
- मुलाखतीचे प्रकार
- मुलाखतकाराची पूर्वतयारी
- मुलाखतकाराने घ्यावयाची काळजी
- मुलाखत लेखन नमुना कृती
- मुलाखत लेखनासाठी काही महत्त्वाचे
- मुलाखत लेखन ९ वी ते १२ वी । मुलाखत लेखन नमुना
आमचे इतर व्याकरण पोस्ट :
- विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
- प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे
- नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?
- वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?
- रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद .