कथा म्हणजे काय ?
काही ठराविक कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात.
एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते.
कथेच्या विषयानुसार वातावरणही असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.
बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत.
विज्ञानकथा म्हणजे काय ?
विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लागतात. त्या शोधांवर आधारित नवीन नवीन यंत्रे उपकरणे तयार केली जातात. विज्ञानाचा परिणाम एवढाच होत नाही. विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. विचारांची दिशा बदलते, अनेक कल्पना बदलतात, धारणा बदलतात, श्रद्धा बदलतात.
नीतीच्या संदर्भातील कल्पनाही बदलतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम होतो. माणसाची जगण्याची रीत बदलते. चालू काळात होत असलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणखी शंभर वर्षांनी किंवा दोनशे वर्षांनी माणसाचे जीवन कसे असेल, याची लेखक मंडळी आपल्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्याने कल्पना करतात आणि त्याआधारे पुढच्या पन्नास-शंभर वर्षांनंतरच्या काळातील जीवनावर आधारित कथा लिहितात, तिला विज्ञानकथा म्हणतात.
ऐतिहासिक कथा म्हणजे काय ?
मागील शंभर वर्षांच्या, दोनशे वर्षांच्या किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षांच्या काळातील सर्वच्या सर्व घटना व व्यक्ती आजच्या माणसाला ठाऊक नसतात. ठाऊक असणे शव नसते. त्यामुळे इतिहासातील काही महत्वाच्या प्रसंगांमध्ये संबंधित माणसे कशी वागली असतील, त्यांच्या मनात कोणकोणत्या भावना निर्माण झाल्या असतील, त्या प्रसंगांत त्यांनी कसा विचार केला असेल, एकमेकांशी ती माणसे काय काय बोलली असतील, असे कुतूहलजनक प्रश्न आजच्या काळातील माणसांच्या मनात निर्माण होतात. प्रतिभावान लेखक आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने वरील प्रश्नांसंबंधी कल्पना करतात. त्यांवर आधारित कथा लिहितात, अशा कथांना ऐतिहासिक कथा म्हणतात.
जातककथा म्हणजे काय ?
जातककथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा होत,पूर्वी वेगवेगळ्या कथा सांगून लोकांना उपदेश केला जाई. कथांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात. या कथांचा परिणाम खूप खोलवर होई. या परिणामामुळे माणसांचे वागणे बदलत असे. यालाच संस्कार म्हणतात. बौद्ध भिक्खूंनी लोकांवर संस्कार करण्यासाठी जातककथांचा उपयोग केला. त्यांना सदाचारी करण्याचा प्रयत्न केला. दया, करुणा, परोपकारिता, औदार्य अशा सद्गुणांचा प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
साहसकथा म्हणजे काय ?
पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा म्हणजे साहसकथा होय . अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, दीन-दुबळे व सज्जन यांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी शूर माणसे पराक्रम गाजवतात. त्यांच्या पराक्रमांच्या कथांना साहसकथा म्हणतात.
रहस्यकथा म्हणजे काय ?
गुन्हेगारांनी काही मागमूस मागे न ठेवल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या गुन्हयाची उकल करणाऱ्या आणि गूढ, गुंतागुंतीच्या समस्येची उकल करणाऱ्या कथा म्हणजे रहस्यकथा होय . सोप्या भाषेत सांगायच जाल तर ज्या कथे मध्ये कोणत्या तरी प्रकारचे रहस्य दडलेले असते त्याला रहस्य कथा असे म्हणतात .
रूपककथा म्हणजे काय ?
कधी कधी एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. त्या वस्तूचे परिपूर्ण वर्णन करणे कठीण बनते. अशा वेळी त्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणादाखल दुसरी एखादी वस्तू वापरली जाते. उदाहरणार्थ, पुढील वाक्ये पाहा :
‘लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. त्याला दयावा तसा आकार मिळतो.’ येथे लहान मुलाचे वर्णन करण्यासाठी मातीच्या गोळ्याचे उदाहरण घेतले आहे. मातीच्या गोळ्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. लहान मुलाचेही तसेच असते. आपण जसे त्या मुलावर संस्कार करू तसेच त्या मुलाला व्यक्तिमत्त्व मिळते. येथे लहान मुलगा आणि मातीचा गोळा या दोन्ही गोष्टी पूर्णपणे समान मानलेल्या आहेत. म्हणून आपण मातीच्या गोळ्याचे वर्णन करतो तेव्हा आपोआपच लहान मुलाचेही वर्णन होत असते, म्हणून येथे मातीचा गोळा हे लहान मुलाचे रूपक आहे, असे म्हणतात. याला काव्यशास्त्रामध्ये रूपक अलंकार असे म्हणतात. या उदाहरणात ‘लहान मूल’ हे उपमेय आहे आणि ‘मातीचा गोळा’ हे उपमान आहे.
रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशत: कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच..
रूपककथेची वैशिष्ट्ये :
● रूपककथा आकाराने लहान असते
● अर्थघनत्व
● आशयसमृद्धी
● सूचकता
● नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता
● वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद
Nice post