कर्मवीर भाऊराव पाटील-Karmvir Bhaurav Patil

कर्मवीर भाऊराव पाटील-Karmvir Bhaurav Patil

 

कर्मवीर भाऊराव पाटील-Karmvir Bhaurav Patil
कर्मवीर भाऊराव पाटील-Karmvir Bhaurav Patil

स्वतःचे विशेष शिक्षण न झालेल्या ज्या माणसाने गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला, त्यांच्यासाठी जागोजागी शाळा काढल्या, खेड्यापाड्यांतून हिंडून हुशार मुलांचा शोध घेतला, त्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली, पुण्यासारख्या शहरात त्या मुलांच्या महाविद्यालयाची सोय केली, असा तो समाजहितचिंतक कोण? तर कर्मवीर भाऊराव पाटील.

भाऊरावांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ मध्ये कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज या गावी एका गरीब कुटुंबात झाला होता. (भाऊरावांना स्वतःला इंग्रजी सहावीतच शाळा सोडावी लागली; पण त्यामुळे ते खचले नाहीत. त्याचवेळी त्यांनी बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचा संकल्प सोडला. कारण अज्ञान हेच सर्व दुःखांचे कारण आहे. हे त्यांनी जाणले होते. शाळा सोडल्यावर काही वर्षे त्यांनी उपजीविकेसाठी व्यापार केला..

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड आणि कूपर इंजिनीअरिंग वर्क्सचे ते फिरते विक्रेते होते. या भ्रमंतीतही त्यांनी झोपड्या आणि झोपडपट्ट्यांतील गरीब जनता यांचा विसर पडू दिला नाही. पुढे आपल्या स्वीकृत कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडून दिली.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा भाऊरावांच्या मनावर परिणाम झालेला होता. विशेषतः कोल्हापूरच्या महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विदयाथ्र्यांसाठी वेगवेगळी वसतिगृहे काढली होती. त्यांपासून स्फूर्ती घेऊन सर्व जाती, पंथांच्या, धर्माच्या मुलांसाठी सांगलीत ‘दूधगाव’ येथे १९१० मध्ये पहिले वसतिगृह काढले. नंतर १९१९ मध्ये साताऱ्यातील ‘काले’ या गावी दुसरे वसतिगृह काढले. या वसतिगृहांतून भाऊरावांनी मुलांवर ‘राष्ट्रीय एकात्मते ‘चा आणि ‘कमवा व शिका’ असे दोन संस्कार केले.

आपल्या शाळा, वसतिगृहे चालवण्यासाठी धनिकांकडून जागा आणि धन मिळवण्यासाठी भाऊराव सर्वत्र’ अनवाणी’ आणि उघड्या डोक्याने फिरत असत. हेतू एकच की, ही विद्येची गंगा गोरगरिबांच्या झोपडीत पोचवायची. तोपर्यंत पायात पायतण घालायचे नाही, हा अण्णांचा पण होता. भाऊरावांनी निवडलेल्या मुलांतून अनेकजण आज उच्च शिक्षण घेऊन महत्त्वाची कामगिरी करत आहेत. त्यांतील काहीना अण्णांनी परदेशातही पाठवले आणि तेही परत येऊन अण्णांच्याच रयत शिक्षण संस्थेत अण्णांचे काम पुढे चालवत आहेत! ‘माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. त्याने कष्ट केले पाहिजेत.

घाम गाळला पाहिजे. तो ध्येयवादी असला पाहिजे,’ असा अण्णांचा ध्यास होता. रयत शिक्षण संस्थेचा आज पसरलेला वटवृक्ष पाहिला की अण्णांचा ध्यास पूर्ण झालेला दिसतो. अण्णांच्या पत्नीने, लक्ष्मीबाईनेही त्यांच्या कार्यासाठी अनेकदा त्याग केला. प्रसंगी मंगळसूत्रापर्यंत सर्व अलंकार देऊन त्यांनी अण्णांच्या कार्याची गरज भागवली. भाऊरावांना लोकांनी आपला मोठा भाऊ म्हणजे ‘अण्णा’ मानले. महात्मा गांधीजींनी ‘कर्मवीर’ म्हणून त्यांना गौरवले, पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लीट्.’ ही उपाधी दिली तर भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. कार्यमग्न भाऊरावांना ९ मे  १९५९ ला मृत्यू आला.

अधिक माहितीसाठी 

—————————————————————————————————————————-

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

Leave a Comment